,

जेजुरी

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ. स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले.
 सभामंडप व इतर काम इ. स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ. स. १७७० मध्ये पूर्ण झाले.
              निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा.कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

देऊळ व परिसर:-
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.
 दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.

खंडोबाची यात्रा व जत्रा:-
खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस,
 मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते
 दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते.कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे,
 बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात.खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.


सर्वांचे आभार..!

मेड इन पुणेच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार..!
आज मराठी भाषेचा वापर सगळीकडे सर्रास होत असताना,
संसाकृतिक वारसा असलेल्या पुणे शहराबद्दल आणि परीसराबद्दलची माहिती मराठीत उपलब्ध असू नये याच आचार्य वाटत....
हीच खंत घेवून हा केलेला खटाटोप...तुम्हाला नक्की आवडेल हि आशा...

तसेच आपल्याकडे काही लेख,फोटो असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते आम्ही आपल्या नावासहित प्रसिद्ध करू.
आपले पुण्याविषयी असलेले मत आपण madeinpune@gmail.com या मेल वरती पाठवू शकता.
तसेच आपल्याला काही बदल सुचवायचे असल्यास तेही सुचवू शकता.
त्यासाठी येथे टिचकी मारा.

काम चालू आहे

ह्या पानाचे काम चालू आहे..लवकरच जोडण्यात येईल...

आपल घर